Thursday 24 May 2012

फुलपाखराचे रंग....
चिमटीत पकडलेल्या फुलपाखराने अलगद ..... अगदी त्याच्या स्वतःच्याही नकळत बोटावर रंग सोडावेत, तितक्या अलगद तुझे रंग तू मला दिलेस. नपेक्षा ते माझ्यावर उमटले; आणि उमटतच राहिले, मी त्यांत माखून जात नाही तोवर.....
......खरंच का आभाळ एवढं मोठं असतं, कि उडण्यासाठी त्या फुलपाखराला जन्मही पुरणार नाही!....अरे पण फुलपाखराचा जन्म हा भरारी मारण्यासाठी नसतोच. तो असतो फुलांच्याही गंधकोषातला  रस लुटण्यासाठी, तो असतो वेलींना सृजनाचा आनंद देण्यासाठी; आणि .... आणि असतो बोटांवर अलगद रंग सोडण्यासाठी! 

Friday 28 October 2011

ती' पत्रं

मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तुला लिहिलेल्या 'त्या' पत्रांमधून कुठेतरी मी तुला जाणवतेय का? धुसर... अंधुक...
...'ती' पत्रं... तीच, जी कधी कागदावर उमटली नाहीतच मुळी!
...काय करू रे, तेवढा स्वच्छ कागद कुठे मिळालाच नाही, नाहीतर ती नाजूक अक्षरं लपून गेली असती; आणि तेवढी अलवार शाईसुद्धा मिळत नाही बाजारात, नाहीतर ते शब्द वाहूनच गेले असते...

Tuesday 18 October 2011

सृजन...

केवढीतरी स्वप्नं उरात घेऊन ते बी हळूच मातीच्या कुशीत शिरलं.
पाण्याच्या अलगद शिडकाव्याने थोड्याच दिवसात रूळलं.
एका हिरव्या कोम्बाने त्याला आणली जाग.
बघते तर काय! हा तर माझ्याच हृदयाचा भाग!



Monday 17 October 2011

काल खूप पाउस आला...
सरत्या सूर्याने आकाशात वेळेआधीच दडी मारली.
तहान भागवून  गवताची पाती हसता-हसता आणखी हिरवी झाली.
मृदगंधाने वेडावून गेलेला, माझ्या केसातला मोगरा सुगंधाची उधळण करून थकला.
भिजायला पडले बाहेर; कारण थोडा वेडेपणा करावासा वाटला. 
चिंब ओली होताना, माझ्या नकळत तू मला पाहिलंस;
मग नुसता पाऊसच आला, भिजणं मात्र राहिलं.
बर्याच वेळाने कळालं, पाउस थांबला सुद्धा!  
चहाचे कप्स तसेच राहिले - तुझा अर्धा-माझा अर्धा!





Wednesday 12 October 2011

कातरवेळी...

कातरवेळी उतरता सूर्य पाहून की आठवतं?...
पिल्लांच्या ओढीने घरट्यात परतणारी चिऊताई,
दिवसभर हसत असलेली आणि आता पेंगुळलेली फुलं,
जगभर फिरून येऊन आता रेंगाळणारा वारा,
भोवरयाची ज्याळी, दांडू हरवलेली विटी, पतंगाचा उरलेला मांजा,
खरचटलेलं कोपर, वीसकटलेले केस, पोटात उड्या मारणारी भूक, 
लहानपणी, पदराला हात पुसत, टाचा उंचावून, दारात आपली वाट बघणारी आई,
खेळून आल्या आल्या, पोटात जाऊन गुदगुल्या करणारं माठातलं थंडगाssर पाणी.

एक पान...

 कित्येक प्रकाशवर्षांचा  प्रवास करून थकलेलं उन, दाट सावलीतून वाट काढत, हिरव्याजर्द पानावर हळूच विसावलं; आणि प्रकाशाच्या उबदार स्पर्शासाठी आतुरलेलं ते पान सोनहळदीने माखून निघालं !

Monday 10 October 2011

मी माझी...

गर्दीत या स्वत:ला शोधताना हरवले मीच!
शोधून देईल का कोणी मला, स्वत:ला, मीच?