Friday, 28 October 2011

ती' पत्रं

मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तुला लिहिलेल्या 'त्या' पत्रांमधून कुठेतरी मी तुला जाणवतेय का? धुसर... अंधुक...
...'ती' पत्रं... तीच, जी कधी कागदावर उमटली नाहीतच मुळी!
...काय करू रे, तेवढा स्वच्छ कागद कुठे मिळालाच नाही, नाहीतर ती नाजूक अक्षरं लपून गेली असती; आणि तेवढी अलवार शाईसुद्धा मिळत नाही बाजारात, नाहीतर ते शब्द वाहूनच गेले असते...

Tuesday, 18 October 2011

सृजन...

केवढीतरी स्वप्नं उरात घेऊन ते बी हळूच मातीच्या कुशीत शिरलं.
पाण्याच्या अलगद शिडकाव्याने थोड्याच दिवसात रूळलं.
एका हिरव्या कोम्बाने त्याला आणली जाग.
बघते तर काय! हा तर माझ्याच हृदयाचा भाग!



Monday, 17 October 2011

काल खूप पाउस आला...
सरत्या सूर्याने आकाशात वेळेआधीच दडी मारली.
तहान भागवून  गवताची पाती हसता-हसता आणखी हिरवी झाली.
मृदगंधाने वेडावून गेलेला, माझ्या केसातला मोगरा सुगंधाची उधळण करून थकला.
भिजायला पडले बाहेर; कारण थोडा वेडेपणा करावासा वाटला. 
चिंब ओली होताना, माझ्या नकळत तू मला पाहिलंस;
मग नुसता पाऊसच आला, भिजणं मात्र राहिलं.
बर्याच वेळाने कळालं, पाउस थांबला सुद्धा!  
चहाचे कप्स तसेच राहिले - तुझा अर्धा-माझा अर्धा!





Wednesday, 12 October 2011

कातरवेळी...

कातरवेळी उतरता सूर्य पाहून की आठवतं?...
पिल्लांच्या ओढीने घरट्यात परतणारी चिऊताई,
दिवसभर हसत असलेली आणि आता पेंगुळलेली फुलं,
जगभर फिरून येऊन आता रेंगाळणारा वारा,
भोवरयाची ज्याळी, दांडू हरवलेली विटी, पतंगाचा उरलेला मांजा,
खरचटलेलं कोपर, वीसकटलेले केस, पोटात उड्या मारणारी भूक, 
लहानपणी, पदराला हात पुसत, टाचा उंचावून, दारात आपली वाट बघणारी आई,
खेळून आल्या आल्या, पोटात जाऊन गुदगुल्या करणारं माठातलं थंडगाssर पाणी.

एक पान...

 कित्येक प्रकाशवर्षांचा  प्रवास करून थकलेलं उन, दाट सावलीतून वाट काढत, हिरव्याजर्द पानावर हळूच विसावलं; आणि प्रकाशाच्या उबदार स्पर्शासाठी आतुरलेलं ते पान सोनहळदीने माखून निघालं !

Monday, 10 October 2011

मी माझी...

गर्दीत या स्वत:ला शोधताना हरवले मीच!
शोधून देईल का कोणी मला, स्वत:ला, मीच?